छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव येथील विवाहित बहिणीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून दोन भावांनी बहिणीचा कु-हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी फर्दापूर पोलिसांनी दोन भावांसह आई. वडिलांवर गुन्हा दाखल केला. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने २० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चंद्रकलाबाई धोंडिबा बावस्कर (३५) असे मयत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील चंद्रकलाबाई धोंडिबा बावस्कर ही पतीसोबत वाद झाल्याने काही दिवसांपासून माहेरी आई, वडिलांकडे एकटीच राहत होती. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. त्यांचे तोंडापूर येथील एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत, असा संशय त्यांचे दोन भाऊ व आई-वडिलांना होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी शिवारात शमीम शाह कासम शाह (वय ३० वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर ) हे काम करीत असताना तेथे चंद्रकलाबाई धावत आल्या. त्यांनी ‘माझे भाऊ व आई वडील प्रेमसंबंधांच्या कारणावरून माझा जीव घेणार आहेत. त्यामुळे मला वाचवा, कोठे तरी लपवा, अशी त्यांनी विनवणी केली. शमीम यांनी तिला त्यांच्या बकऱ्याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले. काही वेळात तिथे चंद्रकला यांचे भाऊ कृष्णा धोंडिबा बावस्कर आणि शिवाजी धोंडिबा बावस्कर हे आले. त्यांच्या हातात कुन्हाड होती. त्यांनी शेडमध्ये पाहणी करून अखेर चंद्रकलाबाई यांचा शोध घेऊन मारहाण सुरू केली. हातातील कुन्हाडीने चंद्रकलाबाई यांच्या डोक्यात घाव घातले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी तिथे चंद्रकलाबाई यांचे आई-वडीलदेखील आले. यावेळी शमीमने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत पहूर पोलिस ठाणे गाठले. याबाबत पोलिसांना माहिती दिली.