नवी दिल्ली : वृत्तसंस्था
तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाने मालवाहू ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार झाले. चालकासह पाचजण बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बडची गावातील राहणारे आहेत.
आंध्र प्रदेशातील अन्नमया जिल्ह्यातील तिरुपतीजवळील कव्वीपल्ली येथे दि.१५ रोजी शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला आहे. अपघातात अकरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हनुमंत अजूर (वय ३२), महानंदा अजूर (३२), शोभा अजूर (३२), अंबिका अजूर (१४, चौघेही रा. बडची, ता. अथणी, जि. बेळगाव), हनुमंत जाधव (४२) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. अकरा जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील १६ भाविक वाहनांतून तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेऊन घरी परतत होते. हनुमंत जाधव हा वाहन चालवत होता. आंध्र प्रदेशातील अन्नमया जिल्ह्यात आल्यानंतर भरधाव वाहनाने मालवाहू ट्रकला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. सुरुवातीला मृतांची ओळख पटली नाही, त्यांच्याकडे सापडलेल्या ओळखपत्रावरून काही वेळानंतर ओळख पटविण्यात यश आले.