जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असून, डेंग्यू सदृश्य आजारांचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. यात जळगावपासुन जवळच असलेल्या शिरसोली गावात देखील डेंग्युने थैमान घातले असून, एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला आहे. याशिवाय गावात डेंग्यू पॉझिटिव्ह आणखी रुग्ण आहेत.
जळगाव शिरसोली प्र. वो. येथील बारी नगरात तालुक्यातील देवेंद्र बारी हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. तो आयटीआयचे शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी असल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती त्याला डेंग्यू आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. यामुळे देवेंद्र बारी याच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृतदेह बघून आई-वडिलांसह बहिणींनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. मयत देवेंद्र हा दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. वडीलांना इलेक्ट्रीक कामात मदत करुन कुटूंबाला हातभार लावत होता. दरम्यान, गावकर्यांनी आरोग्य यंत्रणेविरुद्ध संताप होत आहे. मयत तरुण राहत असलेल्या परीसरात घाणीचे साम्राज्य असल्यामुळे देवेंद्रला डेंग्यू झाल्याचा आरोप आहे.