रावेर : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील एका गावात एका महिलेने तीन लाखांची खंडणी न दिल्यास पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून बदनामी करेल, अशी धमकी प्रियकराच्या पत्नीला दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. निंभोरा पोलीस स्टेशनला 30 वर्षीय महिलेविरोधात याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील एका महिलेचे एका पुरूषासोबत संबंध असल्याने प्रेयसी असलेल्या या महिलेने चक्क प्रियकराच्या पत्नीला धमकी देत तुझ्या व माझ्या पतीचे संबंध असून ते कायम सुरू ठेवायचे असतील तर मला तीन लाख रुपयांची खंडणी देत अन्यथा मी तुझ्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली. तक्रारदार विवाहितेच्या नातेवाईक महिलेलादेखील प्रेयसी महिलेने मारहाण करुन आमच्यात हस्तक्षेप करायचा नाही, अशी धमकी दिली. आमच्या दोघांमधे आलात तर मी आत्महत्या करेन आणि तुझे नाव जाहीर करेन अशी धमकी या प्रेयसी महिलेने विवाहितेच्या नातेवाईक महिलेस दिली आहे. 27 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी धमकी देणार्या महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.



