ठाणे : वृत्तसंस्था
कसारा येथील वीर तानाजीनगर परिसरातील एका घरात प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आल्याने ठाणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सोमनाथ सोनवणे (वय २३ वर्ष) आणि सुजाता देशमुख (वय २१ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. सोमनाथ आणि सुजाता यांनी आत्महत्या करण्याचं कारण काय? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ आणि सुजाता हे मूळ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवाशी होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने दीड महिन्यांपूर्वी दोघेही घर सोडून कसारा येथील तानाजीनगर परिसरात आले होते. दरम्यान, १२ सप्टेंबर रोजी सोमनाथ आणि सुजाताने ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घरमालकाला दोघांचेही मृतदेह एकमेकांच्या बाजूला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती कसारा पोलिसांना दिली. माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. बी. तडवी, उपनिरीक्षक एस.बी. जाधव पथकासह दाखल झाले. पोलिसांनी दोघांच्याही कुटुंबियांना फोनवरुन संपर्क साधत घटनेची माहिती दिली. दोघांचेही मृतदेह अकोले येथे नेल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणतीही चिठ्ठी लिहीली नसल्याने कारण कळू शकले नाही.