मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील चांदिवली येथे एसयूव्ही कारची धडक बसून एक ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या आलिशान गाडीचा चालवणारा चालक, हा अवघ्या १४ वर्षांचा मुलगा होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, एकच खळबळ माजली असून एवढ्या लहान मुलाच्या हातात कार देणाऱ्या पालकांबद्दलही संताप व्यक्त होत आहे.
चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती रोड येथील कॉलनीजवळ ही दुर्घटना घडली. त्या व्हिडीओनुसार, सकाळच्या सुमारास एक ज्येष्ठ नागरिक कॉलनीच्या गेटमधून चालत बाहेर आले व रस्त्याच्या कडेने चालत होते. तेवढ्यात त्याच बिल्डींगच्या गेटमधून एक एसयूव्ही (कार) बाहेर आली. डावीकडे वळतानाच एसयूव्हीची, बाजूला उभ्या असलेल्या रिक्षाला धडक बसली. मात्र ऑटोला जोरदार धडक दिल्यानंतर त्या कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या वृद्ध व्यक्तीलाही धडक दिल्याचे व्हिडीओत दिसून आले. ऑटो आणि वृद्ध माणसाला धडकल्यानंतर एसयूव्ही कार चालवणाऱ्या त्या मुलाने आपली एसयूव्ही भरधाव वेगाने पुढे नेली आणि तो तेथून फरार झाला. गेटमधून बाहेर येतानाच त्या मुलाचे कारवरील नियंत्रण सुटल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहेत. ताबा सुटल्याने त्याने आधी ऑटोला व त्यामागोमाग वृद्ध नागरिकालाच धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारची जोरदार धडक बसल्याने पीडित वृद्ध नागरिक खाली कोसळले आणि गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या मदतीसाठी तत्काळ धाव घेतली आणि त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना पुढील तीन महिने संपूर्ण बेडरेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पोलिसांनी कार चालवणाऱ्या मुलाच्या पालकांवर कारवाई केली आहे. त्यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून तो भरल्यानंतर मुलाची सुटका करण्यात आल्याचे समजते.