जालना : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात सुरू असलेले आंदोलन अखेर सुटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये आले आणि त्यांच्या हस्ते ज्यूस घेत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले आहे. मात्र, त्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या 15 व्या दिवशीच यावरील तोडगा निघाला होता. मात्र, उपोषण सोडण्यासाठी 17 वा दिवस उजाडावा लागला. त्यामागे अनेक कारणे आहेत. मुंबई पासून ते आंतरवाली सराटीपर्यंत अनेक घटनाक्रम घडल्यानंतर उपोषण अखेर मागे घेण्यात आले. इतकेच नाही तर सरकारला आणखी 10 दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला. म्हणजेच आता सरकारला 40 दिवसांचा अवधी आहे. इतकेच नाही तर जागेवरुन हटणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली होती. त्यातही सरकारला यश आले असून मनोज जरांगे आता दवाखान्यात तीन ते चार दिवस उपचार घेण्यासाठी दाखल होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनला जेवढे यश आले, तेवढेच यश सरकारला देखील आले असल्याचे दिसून येत आहे.
मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले असले तरी या बाबत शासन फारसे गंभीर नव्हते. मात्र, 1 सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर याची धग राज्यभर पसरली. या घटनेनंतर शरद पवारांपासून उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर असे राज्यातील सर्वच मोठे नेते आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. त्यामुळे सरकार चांगलेच बॅकफूटवर पडले. इतकेच नाही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर माफी मागावी लागली.