जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील चोपडा मार्केटमधील हॉटेल लयभारी हॉटेलमधील कुंटणखाना प्रकरणी पाच जणाविरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.१२ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात पाच महिलांसह चार पुरुषांना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मीरा देशमुख, हवालदार सलीम तडवी रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांचे पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले. बनावट ग्राहक पाठवून पोलिस आत गेले. त्यावेळी मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री झाली. त्या ठिकाणी पाच महिला व चार पुरुष सापडले. सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेलचा व्यवस्थापक सागर अहिरे (२८, रा. तीसगाव, जि. नाशिक), हॉटेल कामगार सोमनाथ पवार (२२, रा. उमराणा, जि. नाशिक), जयेश ऊर्फ पाच्या तायडे (२७, रा. हरिओमनगर, जळगाव), किरण सुरवाडे (३०, रा. तांबापुरा, जळगाव), प्रवीण अहिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.