नागपूर : वृत्तसंस्था
एका मुलीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने फेसबुक लाईव्ह केल्यावर आत्महत्या केली. संबंधित तरुणाने व्हिडीओ काढल्यानंतर कन्हान नदीच्या पुलावरून नदीत उडी घेत जीव दिला. कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील मिनीमातानगर परिसरातील मनीष रामपाल यादव मृत तरुणाचे नाव आहे. तो इलेक्ट्रिकचे दुकान चालवायचा. तो रविवारी सकाळी १० वाजता घरून दुचाकीने निघाला. सायंकाळी त्याने अगोदर मोबाइलवर व्हिडीओ तयार केले व त्यात त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने फेसबुक लाइव्ह केले व मोबाइल दुचाकीच्या डिक्कीत ठेवला. त्यानंतर कन्हान नदीत उडी घेत जीव दिला. संपर्कात असलेल्या एका मुलीने त्याला जाळ्यात ओढले व पैशांची मागणी केली. जर पाच लाख रुपये दिले नाहीत तर अत्याचाराची तक्रार करू, अशी धमकी मुलीसह तिच्या आईवडिलांनी दिली. मनीषने त्याच्या परीने पैसे जमविण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे जमा न होऊ शकल्याने त्याने मानसिक तणावातून अखेर आत्महत्या केली, असे प्राथमिक तपासातून पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.