अमरावती : वृत्तसंस्था
अमरावतीहून नांदेडकडे निघालेल्या एसटी बसला वाशिम ते हिंगोली महामार्गावरील चिंचाळा पाटीजवळ अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. या घटनेत बस पूर्णतः जळून खाक झाली असून, महामंडळाचे जवळपास २० लाख रुपयांवर नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अमरावतीहून रविवारी दुपारी ३ च्या सुमारास प्रवाशांना घेऊन ही बस चिंचाळा पाटीजवळ सायंकाळी ६:३० च्या सुमारास आली. या ठिकाणी बस पंक्चर झाल्याने चालक व वाहकांनी प्रवाशांना खाली उतरविले व पाठीमागून येणाऱ्या एका बसमध्ये प्रवाशांना बसवून दिले. त्यानंतर चालक गोपाल कोव्हळे व वाहक ज्ञानेश्वर सांगळे बसचे चाक बदलत असताना हिंगोलीकडून दुचाकीवर आलेल्या तिघा अज्ञातांनी बसवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. यानंतर ते तिघेजण कनेरगाव नाकाच्या दिशेने सुसाट वेगाने निघून गेले. घटनेची माहिती कळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. हिंगोली येथून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आल्यानंतर अर्ध्या तासाने आगीवर नियंत्रण मिळाले.