अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर शहरातील जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेसह तिघांनी एकाच्या डोक्यावर लोखंडी रॉड तसेच कंबरेवर आणि छातीवर चाकूचा वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास चोपडा रस्त्यावर घडली. महिलेस अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण रमेश पाटील (मंगळग्रह मंदिर रस्ता) हा रविवारी रात्री आपला मित्र रतीलाल उर्फ पिंटू सुभाष पाटील याला सोबत घेऊन फिरायला गेला होता. त्यानंतर घराकडे परत येत होता. रामकृष्णशी एक महिन्यापूर्वी भांडण झालेले सनी सुरेंद्र अभंगे (३२), सचिन सुरेंद्र अभंगे (३५), ज्योती जितेंद्र अभंगे (४०, सर्व कंजरवाडा, चोपडा रोड) यांनी कुरापत काढून वाद सुरू केले. तिघांनी शिवीगाळ सुरू केली. सचिनच्या हातात लोखंडी रॉड होता. त्याने रामकृष्णच्या डोक्यावर वार करून जखमी केले तर ज्योतीने हातातील सळईने रामकृष्णला मारहाण केली.
त्याचवेळी सनीने हातातील धारदार चाकूने रामकृष्णच्या कमरेवर आणि छातीवर वार करून त्याला रक्तबंबाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिघांची दहशत असल्याने आजूबाजूचे लोक घराचा दरवाजा लावून लपून बसले. रमेश पाटील, बाळा पाटील, पिंटू व प्रमिलाबाई यांनी आवरण्याचा प्रयत्न केला तेव्हा सनीने त्यांनाही चाकूचा धाक दाखवून धमकी दिली. रामकृष्ण याला उपचारासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. सचिन, सनी व ज्योती यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत. ज्योती अभंगे हिला पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित दोन्ही आरोपी फरार आहेत.