वाशीम : वृत्तसंस्था
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर गावचे सुपुत्र आकाश आढागळे हा जवान भारतीय सैन्यदलात कर्तव्यावर असतांना लडाखमधील लेहमध्ये वीरमरण आलंय. गेल्या ११ वर्षापासून भारतीय सैन्यदलात आकाश आढागळे (वय ३१) कर्तव्य बजावत होता. त्यांच्या मृत्युमुळे आढागळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
लेहमध्ये कर्तव्य बजावत असताना ८ सप्टेंबर २०२३ रोजी एका दुर्घटनेमध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैन्यदलाच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दुर्घटनेमध्ये आकाश यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या होत्या. उपचारादरम्यान रविवारी (१० सप्टेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. आकाश यांच्या पश्चात त्यांची पत्नी रुपाली आढागळे, ४ वर्षाची तनवी नावाची मुलगी, आई विमलबाई आढागळे आणि दोन भाऊ नितीन आढागळे व उमेश अडागळे असा परिवार आहे.