बुलढाणा : वृत्तसंस्था
प्रेम प्रकरणातून राज्यातील अनेक शहरात नको ती घटना घडत असते. अशीच एक धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात २५ वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून ही भयंकर घटना घडली असून या प्रकरणी आरोपी त्रिशरण रामदास इंगळे यास पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील वानखेड या गावातील आकाश सुरेश परघरमोर या २५ वर्षीय युवकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत तरुण व आरोपीच्या पत्नीचे प्रेमप्रकरण असल्याचा संशयातून दिवसाढवळ्या हे हत्याकांड घडले आहे. आरोपी त्रिशरण इंगळे याची पहिली पत्नी मुले येथे सोडून काही वर्षापूर्वी पळून गेली. दुसऱ्या पत्नीसोबतही त्याचे वारंवार चारित्र्यावर संशय घेऊन खटके उडत होते. ९ सप्टेंबर रोजी पत्नीला त्रिशरणने मारहाण केली. त्यामुळे ती मुलीसह माहेरी निघुन गेली होती. मृत आकाश व पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय त्रिशरनला होता. याच संशयाने पछाडल्याने १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता घराजवळ आकाश यास त्रिशरण याने चाकूने सपासप वार करून निर्दयीपणे भोसकले. या हल्ल्यात आकाशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी गाडी सोडून पळून गेला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.