सातारा : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या वर्षापासून सोशल मीडियातील वादातून अनेक ठिकाणी राडा झाल्याच्या घटना घडत आहे. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे दोन गटात झालेल्या हिंसक वादानंतर परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे.
महापुरुषांबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारीत केल्यावरुन हा वाद सुरू झाला होता. दरम्यान एका विशिष्ठ समुदायास या मुळे लक्ष्य करण्यात आले आहे. परिसरात जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली असून प्रार्थना स्थळावरही हल्ला झाल्याचे वृत्त आहे. यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तणावाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात तणाव असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले असून खबरदारी म्हणून सर्व इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान रात्री विशिष्ट समाजाची घरे, दुकाने, हातगाडे, वाहने लक्ष्य करत दगडफेक झाली आहे. याचदरम्यान हिंस्त्र जमावाने घरे, दुकाने यांना आग लावण्यास सुरुवात केली. 2 ते 3 हजार युवकांचा जमाव जमा झाला होता.
संबधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलिस मुख्यालयातून मोठा पोलिस फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे. परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून सर्व इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आक्रमक जमावाने प्रार्थनास्थळात घुसून आतमधील युवकांना मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सूरू असल्याची माहिती समोर आली आहे. जमावाने रस्त्यावर उतरत गोंधळ घातल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य ओळखत जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुसेसावळी येथील एका व्यक्तीने सोशल मिडीयावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट वरून लोकांचा गैरसमज झाला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता. सदर ठिकाणी तात्काळ पोलिस अधिकारी आणि अंमलदार स्टाफने दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणली.