मुंबई : वृत्तसंस्था
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून सर्वच गणेशोत्सव मंडळांनी तयारी आपली तयारी सुरु केली आहे. तसेच अनेक गणेशोत्सव मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासही सुरुवात केली आहे. मात्र मुंबईत जबरदस्तीने वर्गणी गोळा करणाऱ्या मंडळाच्या तीन जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील साकीनाका जंक्शन, शालीमार हॉटेलजवळची ही घटना आहे. एका मंडळातील काही कार्यकर्त्यंनी प्लास्टिक स्क्रॅपवाल्याकडून ५ हजार रुपयांच्या वर्गणीची जबरदस्ती केली. मात्र अशाप्रकारे जबरदस्तीने वर्गणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वीच त्यांच्या सूचनांमध्ये कार्यकर्त्यांनी वर्गणी वर्गणीच्या स्वरूपातच मागावी, खंडणी मागू नये अन्यथा कारवाई केली जाईल असे म्हटले होते. मात्र काही मंडळाचे कार्यकर्ते ठराविक वर्गणीसाठी आग्रही असतात. असाच प्रकार साकीनाका येथील मेट्रो स्थानकाजवळ असलेल्या एका दुकानदारासोबत झाला.
आरोपी प्रदीप पांडे, कृष्णा गुप्ता, अब्बास शेख या तिघांनी एका दुकानदाराकडे वर्गणी म्हणून ५ हजारांची मागणी केली. एवढे पैसे नसल्याचे दुकानदाराने सांगितल्यानंतरही आरोपी त्यांच्या मागणीवर ठाम होते. यातून त्यांच्यात वाद झाला. अखेर दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिघांवर भादवी ३८५, ३४ नुसार गुन्हा दाखल करत या तिघांना अटक केली आहे.