वर्धा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक नागीकाना एअरलाइन्समध्ये नोकरी, खोटे क्रेडिट कार्डसह खोटे लोन देण्याचे आमिष दाखवून कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना घालण्याचा गोरखधंदा वर्धा पोलिसांनी उधळून लावला असून, बदरपूर साऊथ दिल्ली येथील उच्चभ्रू परिसरात सुरू असलेल्या दोन कॉल सेंटरवर कारवाई करून दोघांना अटक केली. फसवणुकीतील ८९ हजार रुपये रोख तसेच मोबाइल, सिम कार्ड असा एकूण २ लाख ३५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आकाश सुभाष सहानी (३०), राकेश रामप्रकाश राजपूत (३०) अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्यातील रहिवासी प्रांजली दिनेश चुलपार हिने मोबाइलवर जॉब सर्च अपडेट नावाचे अॅप डाऊनलोड करून त्यामधील फॉर्म भरला होता. ८ जून २०२३ रोजी तिला अज्ञाताने फोन करून तुम्ही एअर इंडियात नोकरीसाठी अर्ज भरला होता, त्यात तुमची निवड झाल्याचे सांगून फॉर्म भरण्यासाठी, जॉयनिंग लेटर शुल्क भरावे लागतील, असे सांगून ८९ हजार ५०० रुपये फोन पेवरून विक्रम मल्होत्रा या आयडीवर भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने याबाबतची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी याबाबत सायबर पोलिसांना मार्गदर्शन केले. तांत्रिक तपासानंतर हा गुन्हा फरिदाबाद हरयाणा व बदरपूर, साऊथ दिल्ली भागातून झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. पोलिसांनी सतत सात दिवस शोध घेऊन अखेर साऊथ दिल्लीतील बदरपूर परिसरातील उच्चभ्रू परिसरात सुरू असलेल्या दोन बनावट कॉल सेंटरवर छापा मारून दोघांना अटक केली.