जळगाव : प्रतिनिधी
मेहरुण परिसरातील बगीच्याजवळ ५ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत विशाल राजू अहिरे, आशुतोष सुरेश मोरे, दीक्षांत देविदास सपकाळे, शुभम भिकन चव्हाण, गोपाल सीताराम चौधरी (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) हे दबा धरून बसले होते. याबाबतची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस तेथे पोहोचले. आशुतोष सुरेश मोरे हा गावठी कट्ट्यासह सापडला होता, तर त्याचे साथीदार पळून गेले होते. त्यापैकी पाच महिन्यांपासून फरार असलेल्या विशाल राजू अहिरे याला रेल्वे स्थानकातून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. विशाल राजू अहिरे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो रेल्वेने जळगावात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. फरार असलेला अहिरे हा रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सुधीर सावळे, इमरान सैय्यद, योगेश बारी, पोलिस कॉन्स्टेबल साईनाथ मुंडे यांनी अहिरेला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.