पारोळा : प्रतिनिधी
मद्य प्राशन करुन भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या ट्रक चालकने रस्त्यांच्या कडेला चालणाऱ्या सहा वर्षीय लहान चिमुरडीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.8 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील देवगावपासून एक किलोमीटर अंतरावरील वस्तीत दुपारी ३ वाजेच्या सुमारास देवगाव येथील पूजा अनिल भील (वय ६ ) ही गावातील वसंत जिभाऊ नगर परिसरात असलेल्या रस्त्याच्या कडेला चालत होती. या वेळी देवगाव फाट्याकडून देवगावकडे तामसवाडी येथील नीलेश संजय बेलदार (वय २४) या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील आयशर गाडी (एमएच- ०४, एचएस- ४७३१ ) ने पूजाला मागून जबर धडक दिली. मद्याच्या नशेत भरधाव वेगाने ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकाने रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या पूजाला चिरडले. परिसरातील नागरिकांनी लगेच घटनास्थळावरुन चालकाला ताब्यात घेतले. तर बालिकेला रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांच्या १०८ रुग्णवाहिकेतून पारोळा कटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.