मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात पती-पत्नीचे वाद मोठ्या टोकाला जात असतांना एक घटना भिवंडी येथून समोर आली आहे. मोबाइलवरून पत्नीला तलाक देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबई येथे राहणाऱ्या पतीने मोबाइलवरून तीन वेळा ‘तलाक, तलाक, तलाक’ असे बोलून भिवंडीत माहेरी असलेल्या पत्नीला घटस्फोट दिला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पतीसह नणंद आणि नंदेचा पती अशा तिघांविरोधात मंगळवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्गारोड या परिसरातील कशीश मेहताब अन्सारी (२३) हिचा मुंबई साकीनाका परिसरातील मेहताब आजमगीर अन्सारीसोबत निकाह झाला होता. १७ जून ते १४ ऑगस्ट २०२३ या काळात पती मेहताब अन्सारी, नंदोई मोहम्मद रफी अन्सारी, नणंद आलिया मोहम्मद रफी अन्सारी यांनी आपापसात संगनमत करून कशिशचा मानसिक, शारीरिक छळ करीत मारहाण केली. तर नणंदेचा पती याने वेळोवेळी अश्लील नजरेने पाहून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून शिवीगाळ केली, अशी तिने तक्रार केली होती. त्यांनंतर पती मेहताब अन्सारी याने १४ ऑगस्टला सायंकाळी मोबाइलवर संपर्क साधून फोनवरून तीन वेळा तलाक तलाक तलाक असे बोलून पत्नीस बेकायदेशीर तलाक दिला.