भुसावळ : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील तिहेरी हत्याकांडप्रकरणी सहा संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश एस. व्ही. जंगमस्वामी यांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींपैकी देवीदास मधुकर पवार (भील) (३०), अमोल रवींद्र कोळी (२४), मयूर लिलाधर तायडे (कोळी) यांना अटक करून ७ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली होती. गुरुवारी कोठडी पूर्ण झाल्याने त्यांना पुन्हा न्यालयालयात आणले होते. तसेच याप्रकरणात अजून दीपक मधुकर पवार (भील) (२९), मनोज श्रावण मोरे (२५), किरण भागवत सपकाळे (३३) या तिघांना अटक केली आहे. या सहा जणांना गुरुवारी न्यायाधीश एस. व्ही. जंगमस्वामी यांच्या न्यायालयात हजर केले असता सर्वांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकील नितीन खरे यांनी काम पाहिले. या गुन्ह्यात अजून चार आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात वापरलेले चॉपर, लोखंडी पाइप जप्त केले आहेत. अजून काही हत्यारे जप्त करणे बाकी असल्याने आरोपींना अजून पाच दिवस पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील नितीन खरे यांनी केली होती.