पारोळा : प्रतिनिधी
जळगाव ग्रामीण भागात होणाऱ्या अपघाताच्या संख्येत नियमित वाढ होत आहे. नेहमी दुचाकी, चारचाकीचा अपघात होत असतो मात्र नुकताच झालेल्या अपघातात एका चारचाकी कारने सायकलस्वाराला जबर धडक दिल्याने सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना पारोळा शहराजवळील हायवेच्या बायपास रस्त्यावरील धरणगाव चौफुलीवर मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा शहरातील बायपास हायवेवर धरणगाव चौफुलीवर मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहराकडे आपल्या सायकलीने येणारे शिवाजी शामराव मराठे (वय ३८, रा शिवाजी विभाग,पारोळा) हे घरी येत असताना जळगावकडून धुळेकडे जाणाऱ्या इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने सायकल चालक पंधरा ते वीस फूट फेकले गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघाताचे वृत्त कळताच शहरवासीयांनी चौफुलीच्या दिशेने धाव घेत अर्धा तासापर्यंत हायवेवर रास्ता रोको केला. दरम्यान येथे अपघातांचे सत्र सुरूच असल्याने परिसरात असलेले अपूर्ण सर्कलचे काम व कुठल्याही प्रकारची विद्युत रोषणाई नसल्याने या ठिकाणी छोटे-मोठे किरकोळ रोजच अपघात असतात.
नॅशनल हायवे प्रशासनाने या गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याने अनेक जण जखमी झाले तर काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. परिसरात अपघात होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलिसात इनोव्हा चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंदविण्याचे काम सुरू होते.