लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: तालुक्यातील कुसुंबा गावाजवळील रायपूर फाट्याजवळ घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळील रायपूर फाट्याजवळ असलेल्या एका पान टपरीमध्ये दोन जण घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने सायंकाळी ७ वाजता छापा टाकला. यात ३ हजार ६२० रूपये किंमतीचे ४ भारत गॅस कंपनीचे सिलेंडर, ९०५ रूपये किंमतीचे रिकामे सिलेंडर, ७ हजाराचा इलेक्ट्रॉनिक काटा आणि १२ हजार रूपये किंमतीचे गॅस भरण्याचे मशिन असा एकुण २३ हजार ५२५ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर संशयित आरोपी भुषण प्रदिप तोमर (वय-२३) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव आणि अंबादास मंगलसिंग जाधव (वय-५०) रा. सुप्रिम कॉलनी या दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोहेकॉ गफ्फार तडवी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि अनिस शेख करीत आहे.