मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. डोंबिवलीतील टाटा पॉवर लेन परिसरात वाहन दुरूस्ती करणारी अनेक गॅरेजेस आहेत. मात्र त्यांचा व्याप दुकांनापुरताच नसून रस्त्यावरही त्यांचे सामान असते, वाहने दुरूस्त केली जातात. वाहनांचे पार्ट्सही विकले जातात. मात्र दुकानदारांच्या या पसाऱ्यामुळे तिथे चालायलाही जागा नसते, अनेकदा वाहतूक कोंडीही होते. हेच लक्षात घेऊन डोंबिवलीतील रहिवासी असणाऱ्या राजू चव्हाण यांनी त्यांना जाब विचारला. तसेच एक पाऊल पुढे टाकत त्यांनी पालिकेत तक्रार करत कारवाईची मागणी केली. मात्र यामुळे भडकलेल्या गॅरेज मालकासह इतर काही लोकांनी चव्हाण यांना बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली.
गॅरेज मालकाने आधी त्यांना धमकी दिली होती. मात्र रविवारी त्यांना थेट रस्त्यावरच मारहाणच करण्यात आली. लोखंडी रॉडने त्यांना चोपण्यात आले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तेव्हा राजू हे जखमी अवस्थेतच पोलिसांत गेले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. राजू चव्हाण यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान या प्रकरणी रामनगर पोलिस स्टेशन येथे अदखल पात्र तक्रार नोंद करण्यात आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले असून गॅरेज चालकांची दादागिरी समोर आली आहे. टाट पॉवर लेन या संपूर्ण रस्त्यावर अनेक गॅरेजेस आहेत. मात्र त्यांचा पसार रस्त्यावरही असतो. यामुळे तेथे चालण्या पुरतीही जागा नसते. नेहमीच ट्राफिक जामही गहोते तर काही वेळा अपघात होऊन नागरिक जखमी झाले. राजू चव्हाण यांनी याविरुद्धच आवाज उठवला होता. त्यांनी पालिका प्रशासन, वाहतूक विभाग व पोलीस प्रशासनाकडेही याबाबत तक्रार करत कारवाईची मागणी केली. यामुळेच गॅरेज मालक भडकले होते.