नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदू समाजातील एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घृणास्पद घटना समोर आली आहे. सिंध प्रांतातील एका हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी आलेल्या एका २३ वर्षीय हिंदू तरूणीवर डॉक्टरांनी सामूहिक बलात्कार केला.
किडनीच्या इलाजासाठी आलेल्या या तरुणीची संबंधित घटनेनंतर तब्येत बिघडल्याने तिला हैदराबादच्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले असून आरोपी डॉक्टर आणि त्याचे सहाय्यक फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सिंध प्रांताच्या टंडो मुहम्मद खान शहरातील इंडस हॉस्पिटलमध्ये घडली. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी डॉक्टरने तिला गुंगीचे औषध दिल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याबद्दल पीडितेच्या कुटुंबियांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर त्या फिर्यादीची पोलिसांनी तातडीनं दखल घेतली आहे. आरोपी डॉक्टर आणि त्याचे सहाय्यक फरार असल्याचे तपासातून समोर आले आहे. अल्पसंख्याक हिंदू समाजातील मुली व सूना रुग्णालयातही सुरक्षित नाहीत असे म्हणत पीडितेच्या कुटुंबियांनी निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी केली आहे.