मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील जालना जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाची राज्यभर पडसाद उमटत असून आज तर राज्यातील अनेक जिल्ह्यात बंदही पुकारण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी व्यवहार बंद आहेत. तर अनेक ठिकाणी एसटीची वाहतूक ठप्प आहे. तर, दुसरीकडे राजकीय नेत्यांचा जालन्यात जाण्याचा ओघ काही कमी होताना दिसत नाहीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यात येणार आहेत.
राज ठाकरे हे सकाळीच जालन्याकडे जायला निघाले. औरंगाबादला आल्यानंतर ते कारने जालन्याकडे जायला निघाले होते. यावेळी राजापूर जवळ मराठा आंदोलकांची निदर्शने सुरू होती. राज ठाकरे यांचा ताफा आल्याचं समजताच या आंदोलकांना राज ठाकरे यांचा ताफा अडवला. राज ठाकरे यांनीही कारच्या खाली उतरून मराठा आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. यावेळी आंदोलकांनी राज ठाकरे यांना निवेदनही दिलं. यावेळी आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली होती. राज ठाकरे यांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पुन्हा त्यांचा ताफा राजापूरकडे रवाना झाला.
त्यानंतर पुन्हा दाभरूळ गावात मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना निवेदने दिली. पैठणच्या आडगाव जावळेतही त्यांचा ताफा अडवण्यात आला. त्यावेळी त्यांनी माईकवरून आंदोलकांशी संवाद साधला. मी घटनास्थळी गेल्यावर माझी भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या राजकारण्यांच्या नादी लागू नका. या लोकांना फक्त तुमची मते हवी आहेत, असंही ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे अंबडमध्ये रुग्णालयात जाऊन जखमी मराठा आंदोलकांची विचारपूस करणार आहेत. त्यानंतर ते अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच त्यांच्याकडून घडलेल्या घटनेची माहितीही घेणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे या ठिकाणी येत असल्याने या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात आज ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी निदर्शनेही करण्यात येत आहे. राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जालन्यातील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आज महाविकास आघाडीचे आंदोलन करण्यात येणार आहे. कोथरूडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.