मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महामार्गावर सुरु असलेल्या अपघाताची मालिका अजूनही संपत नसून महामार्गावर नियमित अनेकांचे जीव जात आहेत. अशीच एक धक्कादायक घटना हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कळमनुरी शिवारात घडली आहे.
भरधाव कार दुभाजकावर आदळून हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कळमनुरी शिवारात झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आज ३ रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कळमनुरी शिवारात हा भीषण अपघात घडला. अपघातात प्रा. जयप्रकाश पाटील कावरखे, मंजूषा जयप्रकाश पाटील कावरखे यांचा मृत्यू झाला आहे. ते सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी होते. अपघातातील दांपत्याचा मुलगा पराग पाटील गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील जिजामातानगर भागातील रहिवासी प्राध्यापक जयप्रकाश पाटील, त्यांची पत्नी मंजूषा पाटील व मुलगा पराग पाटील हे तिघे जण त्यांच्या कारने नांदेडकडून हिंगोलीकडे निघाले होते. त्यांची कार कळमनुरी शहरापासून काही अंतरावर आली असताना पराग याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजकावर आदळून रस्त्याच्या खाली जाऊन तीन ते चार वेळा उलटली. कारची चारही चाके वर झाली. या अपघातात कारमधील प्राध्यापक पाटील व त्यांची पत्नी मंजूषा यांचा जागीचा मृत्यू झाला. तर मुलगा पराग गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे, जमादार प्रशांत शिंदे, कैलास सातव, राष्ट्रीय महामार्गाचे उपनिरीक्षक शेख उमर, शेैलेश मुदीराज, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सय्यद तय्यब, राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी पराग याला उपचारासाठी कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, प्रा. जयप्रकाश पाटील कावरखे हे मुळचे गोरेगाव (ता.सेनगाव) येथील रहिवासी आहेत. कळमनुरीच्या महात्मा फुले विद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले असून मागील चार ते पाच वर्षापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते.