जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एका शोरूममधून विनाक्रमांकाची दुचाकी देऊन ती पुन्हा पासिंगच्या बहाण्याने परत घेत ६० ते ७० जणांना लाखो रुपयांना गंडविल्याप्रकरणी शोरूमच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यासह दोन पंटरला अटक करण्यात आली.
याप्रकरणी शोरूमचे मालक गिरीश चौधरी यांच्यासह दीपक ऊर्फ मनोज हिरालाल कोळी (रा. कांचननगर) आणि सुमित राजू सपकाळे (रा. पांझरापोळ) या दोन पंटरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यात दोन पंटरांना शहर पोलिसांनी अटक केली.
खोटेनगरातील रहिवासी चंद्रकांत इसे हे सेवानिवृत्त असून त्यांच्या पत्नी या राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल आगारात आगार व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहेत. सन २०२२ मध्ये दीपक ऊर्फ मनोज हिरालाल कोळी याने इसे यांच्या पत्नीला तुम्हाला कमी किमतीमध्ये दुचाकी पाहिजे का, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी होकार दिल्यानंतर दीपक कोळी याने इसे दाम्पत्याची त्याचा मित्र सुमित राजू सपकाळे याच्याशी भेट घालून दिली. त्यानंतर दादावाडी परिसरात असलेल्या दत्त शोरूमच्या मालकासोबत टायअप असून दुचाकी खरेदी करताना जीएसटी लागणार नाही. त्यामुळे बाजार भावापेक्षा दहा ते बारा हजार रुपये कमी किमतीमध्ये नवीन दुचाकी मिळवून देतो असे सांगण्यात आले. त्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेत नवी दुचाकीदेखील मिळवून दिली. काही दिवस दुचाकी वापरल्यानंतर तुम्हाला तुमची गाडी आरटीओ पासिंग करून देतो असे सांगत पुन्हा घेऊन गेले. मात्र, ती दुचाकी अद्यापपर्यंत त्यांच्या ताब्यात दिली नाही. असाच प्रकार ते इतरांसोबत करीत होते. दुचाकी खरेदी करून देण्याचा बहाणा करून चंद्रकांत सदाशिव इसे (६१) यांची १ लाख ६६ हजार १११ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असताना दादावाडी परिसरातील दुचाकीच्या शोरूमचा मालकच दोन पंटरांना विना क्रमांकाच्या दुचाकी देत होता. त्यानंतर त्या दुचाकी पासिंग करून देण्याच्या नावाखाली परत घेऊन फसवणूक करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.