मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेनंतर राज्यभर आता या घटनेचे पडसाद उमटत आहेत. राज्यभरातील बससेवा कोलमडली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये किती बस सोडण्यात आल्यात तसेत किती बस रद्द करण्यात आल्यात. कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती आहे याची माहिती जाणून घेऊ.
हिंगोलीमध्ये आगार व्यवस्थापनाने आगारातील ६३ बसेसच्या एकूण ३७० बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. या संपूर्ण बसेस आगारामध्येच उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुढील आदेशापर्यंत ही संपूर्ण बस वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात येणार असल्याचे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात महामंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. शिर्डी बस स्थानकावर प्रवासी, साईभक्त आणि विद्यार्थ्यांचे हाल होतायत. मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जमुळे आंदोलकांनी रात्री बसेसची जाळपोळ केली होती. परिवहन विभागाकडून खबरदारी म्हणून बससेवा बंद करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, राहता, कोपरगाव, अकोले,संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा या बस स्थानकावरील बस बंद आहेत. शिर्डी बस स्थानकावर येणाऱ्या साई भक्तांचे बस बंद असल्याने हाल झालेत. शिर्डी बस स्थानकावर दररोज राज्यभरातून येणाऱ्या ३२४ बससेची ये जा होतेय.