जळगाव : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांच्यासह पूर्ण मंत्रीमंडळ जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पुढील आठवड्यात ‘शासन आपल्या दारी’च्या निमित्ताने आ.किशोर पाटील आपले शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. आमदार किशोर पाचील यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पाचोरा (जळगाव) येथे होत आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांसह मंत्रीमंडळच पाचोऱ्याला येईल असा दावा त्यांनी केला आहे.
आमदार पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील आदी उपस्थित होते. पाचोरा-भडगाव येथे यापूर्वीच २६ ऑगस्टला ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा व आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे येथे होणाऱ्या कार्यक्रमांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे आमदार पाटील नाराज झाले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याने अखेर मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या मतदारसंघात जाऊन पुन्हा एकदा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम घेण्यास तयार झाले आहेत.
पाचोरा येथे होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांसह सर्वच मंत्री उपस्थित राहणार आहेत. पाचोरा व भडगाव तालुक्यांतील २५ हजार लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार असल्याने पाचोरा व भडगाव तालुक्यांतील लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यानिमित्ताने त्यांचा राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याचा विचार आहे. नगरदेवळा (ता. पाचोरा) शिवारात मंजूर असलेली शासकीय औद्योगिक वसाहत, काकणबर्डी परिसराचे सुशोभीकरण, क्रीडासंकुल, भडगाव रोड भागातील महाराणा प्रताप चौक ते रेल्वे पुलापर्यंत राष्ट्रीय महामार्गाला लागून मंजूर असलेला जॉगिंग ट्रॅक व ऑक्सिजन पार्कचे ऑनलाइन भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी तयारी सुरू आहे.