मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आता मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता त्यामुळे राज्यातील वातावरण तापले असून त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये आंदोलकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार जालना जिल्ह्यात जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत.
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचं उपोषण सुरु होतं. यावेळी कथितरीत्या पोलिसांवर गदडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले आहेत. शरद पवार आज जालना जिल्ह्याला भेट देणार असून हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी आंदोलकांची ते विचारपुस करतील.
जालन्यातील घटनेचे पडसाद राज्यात दिसून येत आहेत. बीडमध्ये आंदोलकांकडून बंदचे आवाहन करण्यात आले आहे. जालना, बीड, संभाजीनगरमध्ये तणावाची स्थिती आहे. शुक्रवारी धुळे-सोलापूर महामार्गावर १४ गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. माहितीनुसार, आतापर्यंत ४५ पोलिस जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.
जालन्यातील घटनेचा सर्व स्तरातील नेत्यांकडून निषेध व्यक्त होत आहे. उदयराजे भोसले यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला अशी प्रतिक्रिया दिली.