चोपडा : प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातून नेहमीच गावठी बनावटीची पिस्तुल जिल्ह्यात येत असल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना पुन्हा एकदा चोपडा तालुक्यातील सत्रासेन ते उमर्टी रस्त्यावर ७५ हजार किमतीचे तीन गावठी बनावटीची पिस्तुले राजेंद्र मुसळे (वय २२) व अनिकेत पीठे (२४), दोघे रा. उरळीकांचन, पुणे यांना चोपड़ा ग्रामीण पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना दि. १ रोजी दुपारी दोन वाजता घडली. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. राजेंद्र मुसळे याची पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरचिडा शिवारात सत्रासेन ते उमर्टी रस्त्यावर चारजण कार (एमएच १२, यूसी- १३७४) मधून गावठी कट्टे घेऊन येत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपी राजेंद्र दत्तात्रय मुसळे व अनिकेत सूर्यकांत पिठे (दोघे रा. उरळीकांचन, पुणे) यांच्याकडून २५ हजार किमतीच्या तीन गावठी कट्टे, १० हजार किमतीचे दोन मोबाईल, ६ लाख किमतीची कार असा एकूण ६ लाख ८७ हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यांतील दोघेजण मात्र फरार झाले आहेत. राजेंद्र मुसळे व अनिकेत पिठे दोघांविरोधात चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यांनी केली कारवाई
सहा पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे, सहायक फौजदार राजू महाजन, पो.हे.कॉ. भरत नाईक, किरण पाटील, पो.कॉ. प्रमोद पारधी, सुनील कोळी, महेंद्र भिल यांनी केली आहे.