कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात लहान मुलींचे मोठ्या प्रमाणात अपहरण होत असल्याच्या घटना सातत्याने वाढत असून आता कोल्हापूरमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. ओळखीतल्याच महिलेने मुलांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापुरमधील कनाननगर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मुलं बेपत्ता झाल्याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी मुलांचा शोध सुरु केला आहे. सांगली,मिरज सह परिसरातील रेल्वे स्टेशन आणि मंदिरांमध्ये पोलिसांकडून दोन्ही मुलांचा शोध सुरू आहे. तीन दिवस उलटले तरी मुलांचा अद्याप शोध लागला नाही. यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रविवारी दुपारी 11 वर्षाची मुलगी आणि 12 वर्षाची मुलगी महावीर उद्यानात खेळायला गेले होते. मात्र संध्याकाळ झाली तरी मुलं घरी परतली नाही. यानंतर घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. मात्र त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, कनाननगरात भीक मागणारी महिलाही मुलं गायब झाल्यापासून बेपत्ता झाली. सदर महिला कधी कधी कनाननगरातील मुलांना भीक मागण्यासाठी घेऊन जायची. यामुळे सदर महिलेनेच मुलांचे अपहरण केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
नातेवाईकांनी शाहूपुरी पोलीस ठाणे गाठत मुलांच्या अपहरणाची तक्रार दाखल करत, सदर महिलेवर संशय व्यक्त केला. शाहूपुरी पोलीस मुलांचा शोध घेत आहेत. तसेच सदर महिलेचा शोध घेण्यासाठी शाहूपुरी पोलिसांचे एक पथक मिरज येथे तर एक पथक गोव्याला रवाना झाले आहे. एक पथक कोल्हापूर शहरात महिला आणि मुलीचा शोध घेत आहे.