सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना सतत घडत असतांना आज पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. आठ वर्षांच्या मुलीशी तिच्या चुलत्याने अश्लील वर्तन केले. हा प्रकार माहिती असूनही पतीने लपवून ठेवला म्हणून पीडितेच्या आईने पतीसह, दीराविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. जेलरोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. यातील पीडितेच्या पित्यास अटक करण्यात आली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील एका भागामध्ये पीडितेची आई तिच्या तीन मुली आणि पतीसह राहते. तिन्ही मुली झाल्याने पतीशी भांडण होऊन १२ ऑगस्टपासून पीडितेची आई व मुली वेगळे राहतात. पीडितेची आई खासगी नोकरी करते. आठ वर्षांच्या मुलीला त्रास होऊ लागल्याने तिच्या आईने विचारणा केली असता चुलत्याने अश्लील वर्तन केल्याचे सांगितले. हा प्रकार नवऱ्याला माहिती असतानाही त्यांनी पत्नीपासून हा प्रकार लपवून ठेवल्याने पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आणि अत्याचार व बाल लैंगिक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. पीडित मुलीच्या पित्यास माहिती लपवून ठेवली म्हणून अटक केली आहे.