नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभर रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण असतो हा. मात्र या सणापूर्वी उत्तर प्रदेशातील एका गावात दुर्दैवी घटना घडली. तेथे एका मुलीला तिची आई ओरडली. यामुळे नाराज झालेल्या मुलीने टोकाचं पाऊल उचलत थेट कालव्यातच उडी मारली. ते पाहून तिला वाचवण्यासाठी तिच्या दिव्यांग भावानेही पाठोपाठ उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात एकच गोंधळ माजला. तातडीने पोलिसांना फोन करण्यात आला. सध्या पोलिसांचे पथक गोताखोरांच्या मदतीने भाऊ आणि बहिणीचा शोध घेत आहे. मात्र काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने लोक घाबरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूरजवळील दुबेपूर गावात ही दुर्घटना घडली. तेथे एका मुलीला तिची आई ओरडल्याने ती नाराज झाली आणि रामगंगा कालव्यात उडी मारली. बहीण पाण्यात पडल्याचे पाहून तिच्या दिव्यांग भावानेही तिला वाचवण्यासाठी पाठोपाठ उडी मारली. मात्र कालव्याच्या जोरदार प्रवाहात भाऊ आणि बहीण दोघेही बेपत्ता झाले. माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले, मात्र अनेक तास उलटूनही यश मिळालेले नाही. नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, मंगळवारी सकाळी पीडित मुलीची आई तिला काही कारणाने रागावली. मात्र मुलीला याचा राग आला आणि ती नाराज होऊन गावाबाहेरील कालव्याच्या पुलावर पोहोचली व तेथून पाण्यात उडी मारली. तिचा भाऊ तिला समजावण्यासाठी तिच्या मागोमाग गेला होता. बहिणीचे हे कृत्य पाहून तिला वाचवण्यासाठी तोही पाण्यात उचरला. मात्र जोरदार प्रवाहामुळे दोघेही पाण्यात वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गोताखोरांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र कोणताही सुगावा लागला नाही. पोलिसांनी एसडीआरएफ टीमच्या मदतीने बचावकार्य हाती घेतले आहे. भाऊ आणि बहिण सुरक्षित परत यावेत यासाठी गावकरी प्रार्थना करत आहे. रात्र झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. मात्र आज (३० ऑगस्ट) सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू केले जाणार आहे.