वर्धा : वृत्तसंस्था
राज्यात आज पहाटेपासून रक्षाबंधन सण साजरा होत असतांना या सणावर वर्धा या शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरावर झेंडा चढवताना विजेचा धक्का लागून ३ जणांचा मृत्यू झाला असून हि घटना वर्ध्याच्या पिपरी मेघे गावात आज ३० ऑगस्ट सकाळी आठ वाजता घडल्याने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेत अशोक सावरकर(वय 55), बाळू शेर (वय 60) आणि सुरेश झिले (वय 33) या तीन तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
वर्ध्याच्या पिपरी मेघे गावातील तुळजाभवानी मंदिरावर झेंडा लावायला तीन तरुण चढले होते. मंदिरातील झेंड्याचा खांब हा 25 फूट उंचीचा होता. झेंडा वरती चढवत असताना झेंड्याच्या लोखंडी खांबाचा तोल सुटल्याने तो शेजारी असलेल्या 33 केव्हीच्या विजेच्या तारेवर पडला, ज्यामुळे तिघांनाही विजेचा धक्का लागला. विद्युत प्रवाहाचा जोरात झटका लागल्याने तीनही तरुण मंदिराच्या शेडवर पडले. या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.रक्षाबंधनाची धामधुम सुरू असतानाच मोठी दुर्घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.