मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात अनेक ठिकाणी चोरी व घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असल्याने राज्यातील पोलीस सर्तक असतांना तीन चोरटे धोकादायक शस्त्रांचा वापर करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना मालाड पोलिसांनी त्यांना अटक केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. पहाटेच्या वेळी हे तिघे मालडमधील रामचंद्र गल्लीत संशयास्पद रितीने फिरताना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांचे आणखी दोन साथीदार राहूल आणि सलमान या दोघांनी तिथून पोबारा केला. तर नाझीर चौधरी, गोविंद उर्फ छोटू आणि लक्ष्मण निर्मल मात्र या तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले. आणि त्यांनी मोठ्या दरोड्याचा कट उधळून लावला. नंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहिम जारी ठेवत इतर दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या.
या ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून चाकू, लोखंडी कटर, स्क्रू ड्रायव्हर, नायलॉनची दोरी आणि प्लास्टिकची टेप यासह दरोड्यासाठी वापरली जाणारी अनेक हत्यारेही जप्त केली. तसेच पोलिसांनी एक रिक्षाही ताब्यात घेतली आहे.