नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात अनेक घटना नात्याला काळिमा फासणाऱ्या घडत आहे. एका दिराने त्याच्या वहिनीला भांडण सोडवून समेट घडवण्यासाठी घरी बोलावले. त्याच्यावर विश्वास ठेवून महिला तिकडे गेलीही. पण त्यानंतर दीर, मोठा दीर आणि आणखी एका नातेवाईकाने तिचा विश्वासघात करत तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर ती पोलिसांत जाऊ नये यासाठी त्यांनी तिला धमकीही दिली. पीडित महिला कशीबशी आपला जीव वाचवून तेथून पळाली. नंतर तिने पोलिस स्थानकात जाऊन तिची आपबीती कथन केली पण पोलिसांनी तक्रार दाखलच करून घेतली नाही. उत्तर प्रदेशातील बरेली येथे हा दुर्दैवी प्रकार घडला आहे.
अखेर पीडित महिलेने बरेली एडीजीजीकडे जाऊन न्यायाची मागणी केली असता , त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत महिलेचा दीर, मोठा दीर आणि नातेवाईकाविरोधात रिपोर्ट दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी आठ लोकांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. मात्र सर्व आरोपी सध्या फरार झाले आहेत.
बरेली येथील बारादरी भागात राहणाऱ्या पीडित महिलेचा तिच्या पतीसह गेल्या 10 महिन्यांपासून वाद सुरू होता. त्यानंतर महिलेचा दीर मुन्ना याने तिला फोन केला आणि भांडण सोडवून समेट करण्यासाठी घरी बोलावले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडित महिला घरी गेली, तेव्हा मुन्ना हा घरी एकटाच होता, त्याची पत्नी माहेरी गेली होती. थोड्यावेळाने तिथे तिचे मोठे दीर तसेच आणखी एक नातेवाईकही आले. त्या सर्वांनी आपल्याला जबरदस्ती घरात रोखले आणि सामूहिक अत्याचार केला, असा आरोप पीडित महिलेने केला. एवढेच नव्हे तर पोलिसात जाऊ नये यासाठी त्यांनी आपल्याला धमकी दिली, असेही महिलेने तक्रारीत म्हटले. या घटनेनंतर पीडित महिला कशीबशी तेथून आपला जीव वाचवून पळाली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून तुरूंगात टाकण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.