यवतमाळ : प्रतिनिधी
जिल्ह्यातील कामरगाव येथून जवळच असलेल्या बेंबळा येथील १४ वर्षे वय असलेली अल्पवयीन मुलगी २४ ऑगस्ट रोजी बोरगाव निघोट येथे शाळेत जात असताना आरोपी मुलाने तिचा विनयभंग केला. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली. यामुळे जबर मानसिक धक्का बसल्याने आरोपीच्या आईने २५ ऑगस्ट रोजी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला.
प्राप्त माहितीनुसार, बेंबळा येथील सरपंच रेखा नरेंद्र जवंजाळ यांचा मुलगा वैभव जवंजाळ याने २४ ऑगस्ट रोजी दुपारी ११ वाजताच्या सुमारास मैत्रिणींसोबत बोरगाव निघोट येथे शाळेत जाण्याकरिता निघालेल्या १४ वर्षीय मुलीच्या समोर (एमएच ३१ बीएच) क्रमांकाची दुचाकी आडवी करत तिचा हात पकडून विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी विलंब न करता आरोपी वैभवला दुचाकी वाहनासह ताब्यात घेतले. त्याच्यावर भादंविचे कलम ३५४ आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याची वाशिम येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे वैभवची आई रेखा जवंजाळ यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत २५ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास विष प्राशन केले. कामरगावच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना तातडीने अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती प्राप्त झाली.


