नांदेड (वृत्तसंस्था) मुंबई एनसीबीने नांदेड-हैदराबाद मार्गावर गुप्त माहितीच्या आधारे मंजराम (तालुका – नायगाव) येथे तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला होता. याप्रकरणी गांजा तस्करी प्रकरणातील संशयित आरोपींना आज बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
१५ नोव्हेंबरला नायगाव तालुक्यातील मांजरम येथे मुंबई एनसीबीने एका ट्रकमधून ११ क्विंटल २७ किलो गांजा जप्त करत ट्रक चालक गोपू राजपूत (गोणबाची, पैठण) तर सुनिल महाजन (जळगाव) या दोन संशयित आरोपींना अटक केली होती. त्यावेळेस न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज कोठडीतील मुदत संपल्याने संशयित आरोपींना बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दाेघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबतची माहिती एस. बी. कुंडलीकर (सरकारी वकील, बिलोली) यांनी दिली.दरम्यान एनसीबीला या दोन्ही संशयित आरोपींकडून ठोस माहिती मिळालेली नाही. परंतु गांजा तस्करीची मोडसअप्रेंडी एनसीबीला कळाली आहे. एनसीबी आता पुढे काय कारवाई करते याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.