जालना : वृत्तसंस्था
राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अनेक अधिकारी लाच घेताना लाच लुचपत विभाग कारवाई करीत आहे. पुन्हा एकदा पोलिसांच्या खाकीला डाग राज्यात लागला आहे. तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेताना जालना जिल्हयातील अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. योगेश हरी चव्हाण (वय-39) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत तक्रारदार यांनी छत्रपती संभाजीनगर एसीबी कार्यालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी संतोष हरणे यांच्याशी गट क्रमांक 718 क्षेत्रातील 5 एकर 29 गुंठ्याचा व्यवहार केला आहे. मात्र, यामध्ये वाद झाल्याने संतोष हरणे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केला आहे. तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये तक्रारदार यांच्या बाजूने मदत करुन देण्यासाठी पीएसआय योगेश चव्हाण यांनी सुरुवातीला तक्रारदार यांच्या मित्राच्या मदतीने दहा हजार रुपये लाच स्वीकारली.त्यानंतर योगेश चव्हाण यांनी आणखी 40 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पीएसआय योगेश चव्हाण यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक राहुल फुला यांच्यासह शिरीष वाघ, राजेंद्र सिनकर, चांगदेव बागुल यांनी केली आहे.