पुणे : वृत्तसंस्था
पुणे शहराला सांस्कृतिक व विद्येचे माहेर घर असे म्हटले जाते पण पुण्यात हत्येचे सत्र थांबता थांबत नाही. काही ना काही कारणातून हत्येच्या घटना सातत्याने वाढत आहेत. क्षुल्लक कारणातून पुन्हा हत्याकांड झाल्याचे उघडकीस आले आहे. नोकरीच्या वादातून मित्रांनीच मित्राला संपवल्याची घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे. शैलेश रमेश मांडगीकर असे हत्या झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मित्राची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. राम श्रीराम आणि गोपाळ कोटलपुरे अशी फरार आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
शैलेश मांडगीकर, राम श्रीराम आणि गोपाळ कोटलपुरे हे तिघेही मजुरीचे काम करत होते. रामच्या सांगण्यावरुन ठेकेदाराने शैलेशला कामावरुन काढून टाकले होते. याचा राग मनात धरुन काल रात्री तिघे मित्र दारु पित असताना शैलेशने राम आणि गोपाळला शिवीगाळ केली. यामुळे राम आणि गोपाळ संतापले आणि त्यांनी शैलेशच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करुन त्याची हत्या केली. यानंतर दोघेही पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. राम हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे, तर गोपाळ हा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोघेही कामानिमित्त पुण्यात वाघोली परिसरात राहतात. आरोपींच्या शोधासाठी लोणीकंद वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या वतीने दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत.