मुंबई : वृत्तसंस्था
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर मोठी बंडखोरी राज्यात झाली होती त्यानंतर पुन्हा भाजप व शिंदे सत्तेत आले त्यानंतर ठाकरे गटात मोठी निराशा असतांना आज एका माजी खासदाराने प्रवेश केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला बळ मिळाले आहे. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज (२३ ऑगस्ट) ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. वाकचौरे यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्तेही ठाकरे गटात सामील झाले आहेत.
भाऊसाहेब वाकचौरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार विनायक राऊत आणि ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या ‘मतोश्री’ या निवासस्थानी वाकचौरे यांनी हाती शिवबंधन बांधलं. यावेळी वाकचौरे यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वाकचौरे हे काँग्रेस, भाजप असा प्रवास करून पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतले आहेत.


