जळगाव : प्रतिनिधी
फुफनगरी फाट्याजवळून विनापरवाना वाळू वाहतूक करणारे मालवाहू वाहन सोमवार, २१ ऑगस्ट रोजी तालुका पोलिसांनी पकडले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अनोळखी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वाळू उपशाला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, महसूल व आरटीओ विभागाने बांभोरी गावातून सर्व ट्रॅक्टर, ट्रक, डंपर जप्त करण्यात आले. त्यानंतर आता वाळू वाहतूकदारांनी शक्कल लढवत मालवाहू वाहनातून वाळू वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारे २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी मालवाह वाहनातून (क्र एमएच १९, सीवाय ८२५७) वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. या पथकाने तालुक्यातील फुफनगरी फाट्याजवळ वाहन अडविले व चौकशी केली असता त्यामध्ये एक ब्रास वाळू आढळून आली. पोलिसांनी वाळूने भरलेले वाहन तालुका पोलिस ठाण्यात जप्त केले. याप्रकरणी पोहेकॉ महेंद्र सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश पाटील करीत आहेत.