जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बैठकीसाठी येत असलेल्या दुचाकीस्वाराचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात घडला. भरधाव गॅस सिलेंडर घेवून जाणार्या ट्रकने धडक दिल्याने पंजाबराव नामदेव बोरसे (52, कोल्हाडी) यांचा मृत्यू झाला आहे. कोेल्हाडीतील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव असल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाची मंगळवारी बैठक असल्याने याा बैठकीसाठी कोल्हाडी विकासोचे सचिव पंजाबराव बोरसे हे सकाळी बोदवड येथून दुचाकीने (एम.एच.19 ए.सी.224) ने जळगावला यायला निघाले. ते शहरातील आकाशवाणी चौकात आल्यानंतर मागून गॅस सिलिंडर घेऊन जाणार्या ट्रकने (एम.एच.04 जे.यु.9596) त्यांना धडक दिली. यात बोरसे चाकाखाली आले व त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर नागरीकांनी तेथे धाव घेतली व पोलिसही तेथे पोहचले. त्यांनी रुग्णवाहिका मागवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला.