नागपूर : वृत्तसंस्था
नागपूर विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) एका तस्कराला अटक करून त्याच्याकडून जवळपास ४४ लाख रुपये किमतीचे ७४३.५६ ग्रॅम सोने जप्त केले. डीआरआयने आरोपीचा पासपोर्ट जप्त करून हे प्रकरण केंद्रीय सीमाशुल्क विभागाकडे सोपविले आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील सचिन चांदोस्कर असे आरोपीचे नाव आहे. तो शुक्रवारी पहाटे एअर अरेबियाच्या विमानाने शारजाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याने हे सोने पेस्ट स्वरूपात अंतर्वस्त्रात लपवून आणले होते. तस्करीबाबत गुप्त माहिती डीआरआयला मिळाली. अधिकाऱ्यांना एका प्रवाशाच्या चालण्याचे हावभाव संशयास्पद वाटले. त्याची तत्काळ झडती घेतली असता त्यांच्या अंडरवेअरमध्ये लपविलेले ७४३.५६ ग्रॅम सोने सापडले. त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासल्यानंतर तो दुबईहून अनेक वेळा भारतात आल्याचे आढळून आले. तो शारजाहून प्रथमच नागपुरात आल्याच अधिकाऱ्यांनी सांगितले.