जळगाव : प्रतिनिधी
जळगाव – ममुराबाद रस्त्यावर झाला अपघात
जळगाव जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी व बसचे होत असलेल्या अपघातामध्ये नियमित वाढ होत असतांना आढळून येत आहे. दुचाकीवर लिफ्ट घेऊन शेताजवळ पोहोचले अन् मागून आलेल्या बसने धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेली महिला व दुचाकीचालक मयूर संजय पाटील (२४) व अनिता अविनाश सावळे (वय ४०, दोघे रा. ममुराबाद) हे दोघं जण जखमी झाले. ही घटना ममुराबाद ते विदगाव रस्त्यावर शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे नऊ वाजेदरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथील मयूर पाटील हा शुक्रवारी सकाळी शेतात जात होता. त्या वेळी रस्त्याने एका शेतकरी महिलेने त्याला लिफ्ट मागितली. दोघे जण गावापासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या शेताजवळ पोहोचले. तेथे महिलेला उतरविण्यासाठी मयूरने दुचाकी थांबविली. रस्त्याच्या कडेला त्याच वेळी मागून येणाऱ्या जळगाव ते यावल बसच्या (क्र. एमएच २० बीएल १४०५) चालकाने ब्रेक दाबला. पावसामुळे गाडी स्लिप होऊन रस्त्याच्या कडेला गेली व दुचाकीला मागून धडक दिली. त्या वेळी शेतकरी महिला जखमी झाली. तसेच मयूरला देखील दुखापत झाली. जखमी महिलेला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले.