जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क व पोलिस प्रशासनाने गावठी हातभट्टी चालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसात तब्बल ९२ जणांना अटक करीत सात लाख ५२ हजार २५५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ व १८ ऑगस्ट या दोन दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण ४० गुन्हे नोंदविले. १८ ऑगस्ट रोजी पोलिस विभागासोबत संयुक्त मोहीम राबविण्यात येऊन त्यात १०५ गुन्हे नोंदविले आहेत. या कारवाईमध्ये ९२ जणांना अटक केली असून इतर १३ जणांचा गावातील तलाठी व पोलिस पाटील यांच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे. या कारवाईमध्ये एक हजार ३२४ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तसेच गावठी दारू बनविण्यासाठी वापरले जाणारे १८ हजार ६७३ लीटर रसायन नष्ट करण्यात आले. कारवाईमध्ये सात लाख ५२ हजार २५५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.