मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाची मुंबईत आज पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे, राज्य सरकारने कॅसिनो कायदा रद्दा केला आहे. महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण व कर) अधिनियम हा कायदा 1976 पासून अस्तित्त्वात आहे. पण, त्याची अद्याप अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे कॅसिनो सुरू करण्यास इच्छूक लोक वारंवार न्यायालयात जातात आणि कॅसिनो सुरू करण्याची परवानगी मागतात. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदाच रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता कॅसिनो सुरू करण्यावर बंदी असणार आहे. याशिवाय आगामी काळातील गौरी-गणपती उत्सावासह दिवाळीत नागरिकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे.
गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवर कॅसिनो सुरु करण्याचा विचार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रात कॅसिनोची घाण नकोच, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानुसार, आता कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.