बीड : वृत्तसंस्था
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह दिग्गज नेत्यांनी पक्षासोबत बंडखोरी केल्यानंतर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेण्याचा निर्णय घेतला असून धनंजय मुंडेंचा बीडमध्ये शरद पवारांची आज जाहीर सभा होत आहे. आता आजच्या सभेत शरद पवार धनंजय मुंडेंचा कसा समाचार घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवार गटाला माझे फोटो वापरल्यास कोर्टात जाणार, असल्याचा इशारा दिला आहे. पवारांचा हा इशारा धुडकावत बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी बॅनरवर पवारांचा फोटो लावला आहे. “कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या,” अशी विनंती मुंडे समर्थकांनी केली आहे. “शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते असून आम्ही त्यांचा सत्कार करणार,” असेही बॅनरवर म्हटले आहे.
आजच्या सभेपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वतीने भव्य रॅलीने पवारांचे स्वागत होणार आहे. सभेसाठी शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी साडेनऊ बीडकडे प्रयाण करणार आहेत. साडेबारा वाजता ते बीड शहरात दाखल होणार आहेत. महालक्ष्मी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी शरद पवारांची जाहीर सभा होईल. सायंकाळी चार वाजता ते बीड येथून छत्रपती संभाजीनगर निघणार आहेत.सभेतून शरद पवारांच्या निशाण्यावर कोण असणार? ते नेमके काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.