लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहराचा विकास वाढला असला तरी आजवर महिला स्वच्छतागृहांची शहरात वानवा राहिली आहे. निधी फाऊंडेशनतर्फे वैशाली विसपुते यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून शहरात महिला स्वच्छतागृहे साकारली जाणार आहेत. फुले मार्केट समोर महिला स्वच्छतागृहाची उभारणी झाल्यानंतर सागर पार्क मैदानावरील अत्याधुनिक आणि वातानुकूलित स्वच्छतागृहाचे सोमवारी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आणि महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. प्रसंगी निधी फाऊंडेशनतर्फे मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
शहराचा विस्तार आणि लोकसंख्या गेल्या १० वर्षात कितीतरी पट वाढली असली तरी महिला स्वच्छतागृहांची मात्र वानवा आहे. निधी फाऊंडेशनकडून २०१५ पासून महिला स्वच्छतागृहांसाठी पाठपुरावा केला जात आहे. जळगावच्या बाजारपेठेत आल्यानंतर प्रसाधनगृह अभावी महिलांची मोठी कुचंबना होत होती. आपला त्रास सांगावा तर कुणाला अशा परिस्थितीत महिलांचे मरण व्हायचे. नित्याचाच झालेला हा त्रास डोईजड झाला असला तरी महिलांचा आवाज दाबला जात होता. काही वर्षांपूर्वी महात्मा फुले मार्केटसमोर स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली होती.
निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी आजवर केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मनपाचे सत्ताधारी पदाधिकारी आणि सुप्रीम कंपनीच्या माध्यमातून शहरात महिला स्वच्छतागृहांची उभारणी होत आहे. सागर पार्क मैदानावर उभारण्यात आलेल्या वातानुकूलित स्वच्छतागृहाचे सोमवारी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, अनंत जोशी, नितीन बरडे आदी उपस्थित होते. निधी इंटरप्रायझेस निर्मित सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि पॅड डिस्पोजल मशीन त्याठिकाणी बसविण्यात आले आहे. सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.
मनपातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जळगावकर महिलांची स्वप्नपूर्ती होण्यास सुरुवात झाली आहे. सागर पार्क मैदानावर उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाच्या लोकार्पणप्रसंगी निधी फाऊंडेशनतर्फे अध्यक्षा वैशाली विसपुते आणि सदस्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन आणि साखर देत तोंड गोड करून स्वागत केले. निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले असून शहरातील इतर ठिकाणी देखील लवकरात लवकर महिला स्वच्छतागृह उभारण्यात यावे अशी मागणी यावेळी केली आहे.